पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
ऑनलाईन गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीची ९ लाख ७ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार सांगवी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना डिसेंबर २०२५ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पूर्णपणे ऑनलाईन माध्यमातून घडली. याप्रकरणी एका महिला आरोपीसह जयेश पाटील आणि अन्य एका अज्ञात महिलेविरुद्ध तसेच संबंधित बँक खातेदारांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादीला आरोपींनी व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधत स्वतःला ‘Capital Monks’ या कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगितले. गुंतवणुकीवर प्रचंड परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत आरोपींनी फिर्यादीला एक लिंक पाठवून अॅप डाउनलोड करण्यास भाग पाडले.
यानंतर अॅपवर विविध बँक खात्यांची माहिती देत आरोपींनी फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने एकूण ₹९,०७,५००/- रक्कम गुंतवणूक करण्यास भाग पाडले. अॅपमध्ये गुंतवणुकीवर मोठा परतावा झाल्याचे दाखवून एकूण रक्कम ₹९० लाखांहून अधिक झाल्याचे दर्शवण्यात आले.
विश्वास बसावा यासाठी सुरुवातीला आरोपींनी फिर्यादीच्या खात्यात ₹२०,०००/- परत केले. मात्र, त्यानंतर संपूर्ण रक्कम काढण्याचा प्रयत्न करताच पैसे विड्रॉल झाले नाहीत. तसेच आरोपींनी सर्व संपर्क तोडल्याने फसवणुकीचा प्रकार उघड झाला.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६ (२), ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अधिकारी कोळी करत आहेत.



