spot_img
spot_img
spot_img

पुण्यात पावसाचा कहर; ८२ ठिकाणी झाडे कोसळली – सिंहगड रस्त्यावर महिलेला गंभीर दुखापत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

शहरात गुरुवारी दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने मोठा कहर माजवला. अवघ्या साडेतीन तासांच्या कालावधीत शहरातील विविध भागांत तब्बल ८२ ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Pune Municipal Corporation च्या अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात दुपारी २:३० ते सायंकाळी ६:०० दरम्यान झाडपडीच्या ८२, पाणी साचल्याच्या ६ आणि सीमा भिंत कोसळल्याची १ घटना नोंदवण्यात आली आहे.

दरम्यान, सिंहगड रस्ता परिसरात एक मोठे झाड अचानक कोसळून एका महिलेला गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

शहरातील अनेक भागांत झाडे आणि भिंती कोसळल्यामुळे रस्ते काही काळ वाहतुकीसाठी बंद करावे लागले. तसेच अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या नेतृत्वाखाली अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. सध्या २० अग्निशमन वाहने, २ रेस्क्यू व्हॅन आणि सुमारे १०० जवान शहरभर विविध ठिकाणी कार्यरत असून पडलेली झाडे हटवणे व नागरिकांना मदत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!