पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
पिंपरीतील संत तुकारामनगर परिसरात मोटारसायकल पार्किंगच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मारहाणीची घटना घडली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी (दि. २१ मार्च २०२६) सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास संत तुकारामनगर येथील यशवंत मित्रमंडळाजवळील परिसरात घडली. याबाबत सचिन अशोक नंदिकर (वय ४६, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांच्या घराच्या तळमजल्यावर राहणारे आरोपी उज्वल निलेश तांदळे (वय १९) आणि निलेश मधुकुमार तांदळे (वय ५१) यांनी मोटारसायकल लावण्याच्या कारणावरून फिर्यादीशी वाद घातला. वाद वाढल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत सोफ्याच्या लाकडी पायाने तसेच लाथाबुक्यांनी फिर्यादीच्या डोक्यावर मारहाण केली.
या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पांडे करत आहेत.



