पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी युनूस खतीब
बस प्रवासादरम्यान लहान मुलांना सोबत घेऊन प्रवाशांचे लक्ष विचलित करत सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिला टोळीचा गुन्हे शाखा युनिट-३ ने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सहा महिला आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून ८९ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक १४७/२०२६ अन्वये समांतर तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळापासून शिक्रापूरपर्यंतच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपींचा माग काढण्यात आला.
तपासादरम्यान आरोपी महिलांचा माग काढत पथकाने शिरूर तालुक्यातील जातेगाव येथे सापळा रचला आणि सर्व आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी बसमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करून चोरी केल्याची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अनुराधा उर्फ पार्वती मंगेश बुध्दिनाथ (३०), अंजली राम बुध्दिनाथ (२१), राधा चरण वैद (२१), कल्पना बाला वैद (२१), श्वेता उमर वैद (२१) आणि जानकी अनिल वैद (३०) यांचा समावेश आहे. सर्व आरोपी सध्या जातेगाव (खुर्द), ता. शिरूर येथील रहिवासी असून मूळचे छत्रपती संभाजीनगर येथील आहेत.
या आरोपी महिलांकडून सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ८९,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून २१ मार्च २०२६ रोजी हा गुन्हा उघडकीस आणण्यात आला.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार तसेच सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.



