पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी युनूस खतीब
चिंचवड परिसरात पान स्टॉलच्या आडून अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत दोघांना अटक केली असून सुमारे ५६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २० मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ९:१५ वाजण्याच्या सुमारास वाल्हेकरवाडी येथील शिवाजी चौकातील मंगलमूर्ती पान स्टॉल येथे ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला.
या कारवाईत आरोपी ज्ञानेश्वर ऊर्फ माउली नामदेव वानखेडे (वय २५) व मोहनलाल गोमाजी भाटी (वय ५५, मूळ रा. राजस्थान) यांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्या ताब्यातून सिल्व्हर रंगाच्या प्लास्टिक पिशवीत ठेवलेली तपकिरी रंगाची, उग्र वास असलेली अंमली पदार्थ मिश्रित पावडर जप्त करण्यात आली.
चौकशीदरम्यान हा अंमली पदार्थ काळेवाडी फाटा, थेरगाव येथील ‘मुकेश ट्रेडर्स’मधून आणल्याचे आरोपींनी सांगितले. या प्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस पुढील तपास करत असून या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.



