पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी युनूस खतीब
जास्त परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक उकळत तब्बल १५ लाख ७६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार भोसरी परिसरात उघडकीस आला आहे.
याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे.
नितीन मनोहर सुपेकर (वय ५७, रा. आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल लक्ष्मण शिंदे (रा. आव्हाळवाडी, वाघोली) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ‘Hobizztop’ कंपनीत गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल असे आमिष दाखवून फिर्यादी व इतर गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. मात्र, गुंतवणूक घेतल्यानंतर कोणताही परतावा किंवा मूळ रक्कम न देता आरोपीने सुमारे १५.७६ लाख रुपयांची फसवणूक केली.
ही घटना २४ जुलै २०२१ पासून भोसरीतील एफ.सी. कॅन्टीन परिसरात घडत असल्याचे समोर आले आहे.
भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे.



