पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब
लोणावळा परिसरातील व्हिला/गेस्ट हाऊसमध्ये १० दिवस मुक्काम करून सायबर फसवणुकीची रक्कम विविध बँक खात्यांत वर्ग करणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात लॅपटॉप, मोबाईल, डेबिट कार्ड व बँक किट जप्त करण्यात आले आहे.
शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून सुमारे ९७.७० लाखांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपी मोनिल मोदी याचा लोणावळ्यात मागोवा घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले.
त्याच्यासह इतर तिघेही संशयित सायबर व्यवहार करताना आढळले.
आरोपी विविध बँकांचे करंट अकाउंट उघडून देशभरातून फसवणुकीची रक्कम गोळा करत असल्याचे उघड झाले असून एका खात्यात १ कोटींपेक्षा जास्त रक्कम फिरवल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाचा सूत्रधार परदेशातून, विशेषतः हाँगकाँगमधून वेब कॅमेऱ्याद्वारे नियंत्रण ठेवत असल्याचा संशय असून पुढील तपास सुरू आहे.



