शबनम न्यूज | प्रतिनिधी
मोहननगर येथील गेली चार ते पाच वर्षे बंद असलेला जलतरण तलाव (स्विमिंग टँक) पुन्हा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असून तलावाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. त्यामुळे लवकरच नागरिकांसाठी हा तलाव पुन्हा खुला होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत विशाल बाळासाहेब काळभोर यांनी सातत्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. पत्रव्यवहार तसेच प्रत्यक्ष भेटी घेऊन तलाव सुरू करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर गेल्या वर्षापासून तलावाच्या दुरुस्ती व विकासाची कामे सुरू करण्यात आली होती.
उन्हाळ्याच्या काळात पोहण्याची वाढती गरज, तरुणांमध्ये असलेली आवड तसेच नवशिक्यांसाठी पोहण्याचे प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे सांगितले जात आहे.
तलावाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचल्याने प्रभागातील नगरसेविका वैशालीताई काळभोर, प्रमोदजी कुटे आणि अरुणाताई लंगोटे यांच्यासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत तलाव लवकरात लवकर सुरू करण्याबाबत चर्चा झाली.
महापालिका अधिकाऱ्यांनी पुढील महिन्यात शक्यतो हा जलतरण तलाव नागरिकांसाठी सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे काळभोर यांनी सांगितले. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प पूर्णत्वाकडे जात असून परिसरातील नागरिकांना लवकरच जलतरण तलावाची सुविधा मिळणार आहे.



