spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवडमध्ये फुटपाथवरील झाडांच्या रोपांसाठी ठिबक सिंचन योजना राबवावी – नगरसेविका योगिता बारणे यांची मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील विविध रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून अनेक ठिकाणी फुटपाथवर झाडांची रोपे लावण्यात आली आहेत. मात्र या लहान रोपांकडे पुरेसे लक्ष न दिल्यामुळे ती उन्हामुळे जळून जातात किंवा पाण्याअभावी वाळून जात असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या रोपांचे संगोपन योग्य प्रकारे व्हावे आणि ती वाढून मोठी झाडे व्हावीत यासाठी फुटपाथवरील झाडांसाठी ठिबक सिंचन (ड्रिप इरिगेशन) योजना राबविण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका योगिता महेश बारणे यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित करत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. शहरातील वाढते प्रदूषण, वाढती वाहतूक आणि कमी होत चाललेली हिरवळ लक्षात घेता झाडांची लागवड ही केवळ औपचारिकता न राहता त्यांचे संगोपन आणि संरक्षणही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फुटपाथवर लावलेली अनेक रोपे पाण्याअभावी कोमेजून जात असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे महापालिकेने ठिबक सिंचन प्रणाली बसवून नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करावा. यामुळे कमी पाण्यातही झाडांना योग्य प्रमाणात पाणी मिळू शकते तसेच पाण्याचीही बचत होईल, असे बारणे यांनी नमूद केले.

तसेच शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, नागरिकांना शुद्ध हवा मिळण्यासाठी आणि वाढते प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी झाडांची संख्या वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे लावलेल्या प्रत्येक रोपाची जबाबदारी घेऊन त्यांची नियमित देखभाल, खतपाणी आणि संरक्षणासाठी महापालिकेने स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

झाडे ही शहराची फुफ्फुसे असून भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवेगार पिंपरी-चिंचवड निर्माण करण्यासाठी प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!