पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी युनूस खतीब
चिंचवड परिसरात पायी जात असलेल्या युवकाचा मोबाईल जबरीने हिसकावून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी निगडी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६७/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०९ (६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. १३ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ९.१० वाजण्याच्या सुमारास संभाजीनगर कमानीजवळील देवी मंदिरासमोरील रस्त्यावर, संभाजीनगर, चिंचवड येथे घडली.
याप्रकरणी शुभम शरद शिंदे (वय २२, रा. लेन नं. ४, शरदनगर, चिखली, पुणे; मूळ रा. पाटखळ, ता. सातारा, जि. सातारा) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम शिंदे हे पायी जात असताना आरोपी जॉर्डन राजु साळवे (वय २०, रा. घरकुल, चिखली, पुणे) हा मोपेड (एमएच १४ जीएम ८५६५) वरून चिखलीच्या दिशेने येत होता. त्याने फिर्यादीच्या हातातील मोबाईल हॅन्डसेट जबरदस्तीने हिसकावून नेला.
त्यानंतर फिर्यादीने आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने आपल्या जवळ असलेल्या टायर पंक्चर काढण्याच्या लोखंडी टूलने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या बोटाजवळ मारहाण करून दुखापत केली.
या प्रकरणी निगडी पोलिसांनी आरोपी जॉर्डन साळवे याला अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.



