spot_img
spot_img
spot_img

कर्जाच्या हप्त्यांवरून वाकडमध्ये तरुणाला मारहाण; रिकव्हरी एजंटविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी : युनूस खतीब, पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड : कर्जाच्या हप्त्यांच्या वादातून एका तरुणाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना वाकडमधील डांगे चौक परिसरात घडली आहे.

या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात रिकव्हरी एजंटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१२ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता वाकड येथील डांगे चौकाजवळ सत्यम बार समोरील रस्त्यावर ही घटना घडली. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२६/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणी प्रमोद कैलास सावंत (वय २५, व्यवसाय सेक्युरिटी गार्ड, रा. वाघेरी कॉलनी नं. ३, पिंपरी गाव, पिंपरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, प्रमोद सावंत हे त्यांचे मित्र रमन द्विवेदी (वय २२) यांच्यासोबत गप्पा मारत उभे असताना सुभाष पुरोहित (वय ३२, व्यवसाय टीव्हीएस क्रेडिट लोन रिकव्हरी एजंट, रा. काळेवाडी, पुणे) हा तेथे आला. त्याने “माझा फोन का उचलत नाहीस, तुझे लोनचे हप्ते बाकी आहेत, पैसे कधी देणार?” असे म्हणत शिवीगाळ केली.

यानंतर आरोपीने फिर्यादीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच हातातील कड्याने डोक्यात मारून जखमी केले. त्यावेळी फिर्यादीचा मित्र रमन द्विवेदी भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने त्यालाही धक्का दिला. तसेच फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी तेथून पळून गेला.

या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सुभाष पुरोहित सध्या फरार आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुंडकर करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!