प्रतिनिधी : युनूस खतीब, पिंपरी-चिंचवड
पुणे : भुगाव रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये ग्राहकांना हुक्का पिण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी बावधन पोलिसांनी कारवाई करत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत हुक्का पॉट, पाईप व फ्लेवरसह साहित्य जप्त करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१३ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.३० वाजता भुगाव रोडवरील कोकोरीको हॉटेल येथे ही कारवाई करण्यात आली.
याबाबत बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९२/२०२६ दाखल करण्यात आला असून सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने अधिनियम (COTPA) कलम ४, २१ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३, २८१, २८७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणी विशाल प्रल्हाद शिंदे (पोलीस शिपाई, बावधन पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे.
तपासात असे निष्पन्न झाले की, अमित अरुण अमराळे (वय ४५, व्यवसाय हॉटेल व्यवसाय, रा. सुतारवाडी, ता. मुळशी, जि. पुणे) आणि पंकज भुवन जोशी (वय ३५, व्यवसाय वेटर, रा. सोनीका सोसायटी, भुगाव, पुणे) यांनी खाद्यपदार्थासोबत ग्राहकांना हुक्का पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती.
कारवाईदरम्यान पोलिसांनी १,००० रुपये किंमतीचे ५ हुक्का पॉट, ५ हुक्का पाईप तसेच १,५०० रुपये किंमतीचा हुक्का फ्लेवरचा डबा आणि इतर साहित्य जप्त केले.
या प्रकारामुळे तंबाखुजन्य व ज्वलनशील पदार्थांचा वापर करून स्वतःच्या व इतरांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, असे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक तांबे करीत आहेत.





Total Users : 213375