spot_img
spot_img
spot_img

पिंपरीत तडीपार आरोपी लोखंडी कोयत्यासह अटक; पिंपरी पोलिसांची कारवाई

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

तडीपार आदेशाचा भंग करून हातात लोखंडी कोयता घेऊन संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या एका आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

ही कारवाई सोमवारी (दि. ९ मार्च २०२६) सायंकाळी चिंचवड येथील शंकरनगर परिसरात करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश मनोहर गायकवाड (वय ३९, रा. विद्यानगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

त्याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ४ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) सह १३५ व १४२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सोमवारी सायंकाळी सुमारे ६.०५ वाजण्याच्या सुमारास एक्साईड बॅटरीसमोर, पशुवैद्यकीय वखार महामंडळाच्या भिंतीजवळ, शंकरनगर, चिंचवड येथील सार्वजनिक रस्त्यालगत आरोपी संशयास्पदरीत्या उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावेळी तो हातात लोखंडी कोयता घेऊन कोणताही दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबलेला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने आरोपीला महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५७ (१) (अ) अन्वये ८ नोव्हेंबर २०२४ रोजी दोन वर्षांसाठी पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतून तडीपार केले होते.

तरीही आरोपीने हा तडीपार आदेश धाब्यावर बसवून संबंधित परिसरात वावर केल्याचे आढळून आले.

याशिवाय, ४ मार्च ते १७ मार्च २०२६ या कालावधीत कोणतेही घातक शस्त्र जवळ बाळगण्यास मनाई करणारा आदेश लागू असतानाही आरोपीकडे लोखंडी कोयता आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक केली.

या प्रकरणी पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!