पुणे: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवारी (८ मार्च २०२६) कोथरूड येथील अलंकार सभागृहात ‘सन्मान स्त्री प्रतिभेचा’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. केवळ स्त्री कलाकारांचा सहभाग असलेल्या या अनोख्या मैफिलीने उपस्थित पुणेकर रसिकांची मने जिंकली.
स्त्री शक्तीच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील प्रतिभेचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना डॉ. लीना राजवाडे यांची होती.
चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू, किलबिल 0किलबिल पक्षी बोलती, कुहू कुहू येई साद, उंच माझा झोका, अरे संसार संसार, सारे कळत नकळतच घडते, अवघाची हा संसार,आळवीते मी तुला विठ्ठला अशा वैविध्यापूर्ण गीतांनी स्त्री मनाची मने जिंकली.
या सुरेल मैफिलीमध्ये डॉ. लीना राजवाडे यांच्यासह प्राची घोटकर, निवेदिता मेहेंदळे, वृषाली मावळंकर, कौमुदी रास्ते-कुलकर्णी, चारुशीला गोसावी, मुग्धा वर्तक आणि स्वाती रांजेकर या सर्वच गुणी स्त्री कलाकारांनी आपली कला सादर केली. यामध्ये गायनासोबतच हार्मोनियम, व्हायोलिन आणि तबला यांसारख्या वाद्यांच्या सुमधुर संगमातून कलाकारांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
रविवारी सायंकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमाला संगीत प्रेमींचा आणि विशेषतः महिलांचा उत्तम प्रतिसाद लाभला. प्रत्येक सादरीकरणानंतर रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना भरभरून दाद दिली. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री प्रतिभेचा हा सांगितिक जागर खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरला.
यावेळी आरती मारूलकर, चित्रा मेटे , कोथरूडच्या नवनिर्वाचित नगरसेविका ज्योत्स्ना कुलकर्णी यांचा देखील सत्कार महिला दीना निमित्ताने करण्यात मंगला पेंडसे यांच्या हस्ते करण्यात आला.



