जागतिक महिला दिनानिमित्त रेबीज जनजागृती व्याख्यान व मनोरंजक खेळांचा उत्साहात कार्यक्रम
पिंपरी चिंचवड : जागतिक महिला दिनानिमित्त यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय तसेच यशस्वी इंग्लिश मीडियम स्कूल येथे ८ मार्च २०२६ रोजी रेबीज आजाराविषयी जनजागृती व्याख्यान, मनोरंजक खेळ व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला महिला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्या देवता सरस्वती यांच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व महिला व माता पालकांचे ढोल-ताशांच्या गजरात औक्षण करून स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कार्यानुभव विषयांतर्गत तयार केलेली आकर्षक शुभेच्छा कार्डे व गुलाबपुष्प देऊन महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री. सुभाष देवकाते तसेच मुख्याध्यापिका सौ. शोभा देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले. संगीत खुर्ची, जलद प्रश्नोत्तरे तसेच इतर खेळांमध्ये महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि कार्यक्रमाला रंगत आणली.
याच वेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मिशन रेबीज जनजागृती मोहिमेअंतर्गत रेबीज या गंभीर आजाराविषयी माहिती देणारे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी महानगरपालिकेच्या एज्युकेशन ऑफिसर श्वेता जयकृष्ण आणि ऋषिका गरुड या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी रेबीज आजाराची कारणे, लक्षणे, प्रतिबंधक उपाययोजना, लसीकरणाचे महत्त्व तसेच भटक्या प्राण्यांपासून सुरक्षित राहण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून पिंपळवाडी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. संगीता ताई देवकाते उपस्थित होत्या. त्यांनी महिलांनी समाजात सक्रिय भूमिका बजावत आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
खेळांमध्ये विजयी ठरलेल्या सर्व स्पर्धकांना विद्यालयाच्या वतीने भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्रितपणे पसायदान म्हणत कार्यक्रमाची सांगता केली.
महिलांचा सन्मान, आरोग्याविषयी जनजागृती आणि आनंददायी वातावरण अशा त्रिसूत्रीमुळे हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.





Total Users : 213409