spot_img
spot_img
spot_img

भारतीय संस्कृती जतन करणे काळाची गरज – आदिनाथ मंगेशकर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भारतीय संस्कृती ही जगातील सर्वांत प्राचीन, समृद्ध आणि विविधतेत एकता दर्शवणारी संस्कृती आहे. वसुधैव कुटुंबकम् हा उदात्त विचार, शांतता, सहिष्णुता, आदर आणि आध्यात्मिक मूल्यांवर आधारित जीवनपद्धती ही भारतीय संस्कृतीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे पाश्चिमात्य संस्कृती समजावून घेत असताना भारतीय संस्कृतीचे जतन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी ‘हेरिटेज यात्रा’सारखे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. येथे पारंपरिक हस्तकलेपासून ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर)सारख्या आधुनिक तंत्रज्ञानापर्यंतचा प्रवास या महोत्सवात अनुभवता येतो. पुणे महानगरपालिका आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे मत प्रसिद्ध संगीततज्ज्ञ आदिनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केले.

ते भारतीय संस्कृतीचा वारसा जतन करण्याच्या उद्देशाने पुणे महानगरपालिका आणि एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एडीटी) यांच्या संयुक्त विद्यमाने सिंहगड रोड येथील पु. ल. देशपांडे कलाग्राम येथे आयोजित ‘हेरिटेज यात्रा–२०२६’ या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

याप्रसंगी फिल्म्स विभाग व दूरदर्शनचे माजी महासंचालक मुकेश शर्मा, पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे प्रशासकीय अधिकारी राजेश कामठे, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक ज्योती ढाकणे-कराड, कुलगुरू डॉ. राजेश एस., प्र-कुलगुरू डॉ. नचिकेत ठाकूर, महोत्सवाच्या निमंत्रक डॉ. अश्विनी पेठे, डॉ. अतुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजेश एस. यांनी भविष्यातील आव्हानांना सामोरे जाताना आपला वारसा आणि संस्कृती यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले की, आपण आपल्या वैदिक संस्कृतीच्या मुळांकडे पुन्हा वळणे आणि तरुण पिढीमध्ये जिज्ञासू वृत्ती विकसित करणे ही काळाची गरज आहे. भविष्याकडे झेप घेताना आपल्या संस्कृतीचा पाया भक्कम असणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे प्रशासकीय अधिकारी राजेश कामठे यांनी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या या पुढाकाराचे आणि पुणे महानगरपालिकेसोबतच्या सहकार्याचे विशेष कौतुक केले. ‘हेरिटेज यात्रा’ हा उपक्रम आगामी काळात अधिक व्यापक आणि भव्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना पुणे महानगरपालिका आणि येथील कलाग्राम केंद्र नेहमीच पूर्ण पाठबळ देईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक ज्योती ढाकणे-कराड यांनी कला ही भारतीयांची जीवनपद्धती असल्याचे सांगत, जागतिकीकरणाच्या युगातही परंपरा न विसरण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांनी कला क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहावे आणि आपल्या कौशल्याचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी करावा, असेही त्यांनी नमूद केले.

उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक विटांची भिंत तयार करणे, आभासी ऐतिहासिक सफर (Immersive Heritage), मातीकाम (Pottery), नाट्य कार्यशाळा, गोंड पेंटिंग, श्लोक पठण, वारली चित्रकला आणि सामुदायिक विणकाम यांसारख्या उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. ७ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या विनामूल्य उपक्रमात पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शनिवारवाड्यापासून ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन

या महोत्सवाचे आकर्षण असलेल्या ‘हेरिटेज प्लेलँड’मध्ये विद्यार्थ्यांसह पुणेकरांना विविध खेळांच्या माध्यमातून इतिहासाची सफर घडविण्यात येणार आहे. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक तज्ज्ञांनी तयार केलेल्या या खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. यामध्ये प्रामुख्याने ‘महामिस्टरी’, ‘डार्ट अँड डिस्कव्हर’, ‘अराउंड इंडिया’ आणि ‘मिस्टरी बॉक्स पझल’ या खेळांनी विद्यार्थ्यांची मने जिंकली. विशेषतः ‘महाराष्ट्रासाठी स्वतःच्या चलनाची रचना करणे’ (Creating Currency Design for Maharashtra) या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आपली सर्जनशीलता दाखवत महाराष्ट्राच्या अस्मितेचे दर्शन घडवणारी चलने रेखाटली. महोत्सवाचाच भाग म्हणून ६ व ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.०० वाजता शनिवारवाड्यापासून ‘हेरिटेज वॉक’ आयोजित करण्यात आला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!