शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहराच्या उपमहापौर पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगरसेविका शर्मिला बाबर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे महापौर व उपमहापौर निवडणुकीतील चित्र अधिक स्पष्ट झाले असून, उपमहापौर पदासाठी राजकीय चुरस निर्माण झाली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने महापौरपदी रवी लांडगे यांची निवड निश्चित झाली असून, त्यांची निवड बिनविरोध पार पडली आहे. भाजपाने उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांना उमेदवारी देत आपली रणनीती स्पष्ट केली आहे.
दरम्यान, उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका वैशाली काळभोर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे उपमहापौर पदासाठी थेट भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळणार आहे.
महापौरपदावर भाजपाचा निर्विवाद विजय झाल्यानंतर आता उपमहापौर पदासाठीची निवडणूक औपचारिक न राहता राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे. शर्मिला बाबर विरुद्ध वैशाली काळभोर या लढतीकडे महापालिकेतील सत्तासमीकरणांच्या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
या घडामोडींमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राजकारण तापले असून, शहराच्या नेतृत्वात कोणाची वर्णी लागणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


