spot_img
spot_img
spot_img

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल? पक्षाकडून खुलासा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची निवड झाल्याचा दावा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले. मात्र, हा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तात्काळ फेटाळून लावला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणतीही निवड करण्यात आलेली नाही. या पदासाठी लवकरच निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल. सध्या या पदावर कोणाचीही नियुक्ती झालेली नाही.”

दरम्यान, माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांवर स्वतः प्रफुल्ल पटेल यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याबाबत काही बातम्या प्रसिद्ध होत आहेत. मात्र या सर्व बातम्या पूर्णपणे निराधार असून त्यात कोणतेही तथ्य नाही.”

पुढे बोलताना पटेल यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. “राष्ट्रवादी काँग्रेस हा लोकशाही मूल्यांवर चालणारा पक्ष आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड ही वरिष्ठ नेतृत्व, आमदार, पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करूनच केली जाईल. सर्व सदस्यांच्या भावना आणि सामूहिक इच्छेचा आदर राखूनच निर्णय घेतला जाईल. राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी पक्षाची निश्चित प्रक्रिया असून त्याच प्रक्रियेचे पालन केले जाईल,” असेही त्यांनी नमूद केले.

या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाबाबतची चर्चा आणखी तीव्र झाली असून आगामी काळात पक्ष कोणता निर्णय घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!