spot_img
spot_img
spot_img
spot_img

क्रांतिदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात विशेष व्याख्यान

शबनम न्यूज | प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध, पुणे येथील इतिहास विभागाच्या वतीने क्रांतिदिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून मा. गीतांजली पि. ए. उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रभंजन चव्हाण होते.

यावेळी संविधान जागर अभियानाच्या वतीने मा. शुद्धोधन, आश्मिता इरवत, सरस्वती इरवत आणि निशांत सिंग उपस्थित होते.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास तसेच स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख वक्त्या गीतांजली यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करताना १८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम, बंगालची फाळणी, स्वदेशी चळवळ, होमरूल चळवळ, असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग आंदोलन आणि भारत छोडो आंदोलन या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या टप्प्यांचा आढावा घेतला.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, करतार सिंह सरभा, कनकलता बरुआ, रावजी गोंड (भीमा गोंड) यांच्यासह अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. स्वातंत्र्य चळवळीला व्यापक जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त होण्यासाठी विद्यार्थी, महिला, कामगार, शेतकरी तसेच समाजातील विविध घटकांनी दिलेल्या सक्रिय सहभागावरही यावेळी प्रकाश टाकण्यात आला.

स्वातंत्र्यलढ्यातील असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, धैर्य आणि संघर्षामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यांच्या कार्यातून देशप्रेम, त्याग, धैर्य, एकता आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या विशेष व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास अधिक सखोलपणे समजून घेण्याची संधी मिळाली. तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाची जाणीव होऊन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय मूल्यांची जपणूक करण्याची भावना दृढ झाली.

कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि ४५ विद्यार्थी उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!