spot_img
spot_img
spot_img
spot_img

क्रांती दिनी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा एल्गार; कंत्राटी कामगारांना समान काम, समान वेतनाची मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 ९ ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने संत तुकाराम नगर येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज सभामंडपात क्रांती दिन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात कामगारांच्या हक्कांसाठीचा लढा यापुढेही सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.

राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी यावेळी कामगारांच्या सद्यस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली. कारखाने, आस्थापना, शासकीय-निमशासकीय कार्यालये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कायमस्वरूपी कामगारांच्या जागी मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कामगारांची नियुक्ती केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

कंत्राटदारांना शासनाने ठरवून दिलेले किमान वेतन मिळत असले, तरी अनेक ठिकाणी कंत्राटी कामगारांच्या खात्यावर कायदेशीर वेतन जमा केले जात नाही. तसेच कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने, विविध सवलती आणि साप्ताहिक सुट्टीपासूनही वंचित ठेवले जात असल्याचा दावा भोसले यांनी केला.

“कायम कामगाराला एखाद्या कामासाठी महिन्याला ४८ हजार रुपये मिळतात, त्याच कामासाठी कंत्राटी कामगाराला केवळ १५ ते १८ हजार रुपये दिले जातात. तेही ३० दिवस काम करून घेतल्यानंतर,” अशी परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.

यशवंत भोसले यांनी आपल्या आंदोलनाच्या आठवणींनाही यावेळी उजाळा दिला. ९ ऑगस्ट २०२२ रोजी कामगार संरक्षणाचे कायदे अधिक मजबूत करण्याच्या मागणीसाठी पुणे कामगार कार्यालयासमोर तब्बल १३ दिवस प्राणांतिक उपोषण करण्यात आले होते. चार वर्षांनंतर ९ ऑगस्टच्या क्रांती दिनाच्या निमित्ताने त्या आंदोलनाची आठवण गुगलच्या माध्यमातून झाल्याचेही त्यांनी सांगितले.

“समान काम समान वेतन” हा अधिकार कायद्याच्या पुस्तकात आहे. कायमस्वरूपी नोकरी आणि नोकरीतील आरक्षणाबाबतही कायदेशीर तरतुदी आहेत; मात्र प्रत्यक्षात कामगारांना त्यांचे हक्क मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

गेल्या २६ वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय तसेच कामगार आणि औद्योगिक न्यायालयांमध्ये कामगारांच्या हक्कांसाठी दाद मागत असल्याचे भोसले यांनी सांगितले. गेल्या तीन दशकांत कामगारांच्या प्रश्नांसाठी अनेक मोर्चे, रस्त्यावरची आंदोलने आणि सात वेळा उपोषणे करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, कायम कामगारांची संख्या कमी होत असून कंत्राटदार आणि कंत्राटी कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, “आमचा विश्वास संविधान, न्यायव्यवस्था आणि सरकारवर आहे. श्रमिक, शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी लोकशाहीचे हे स्तंभ कठोर पावले उचलतील आणि कामगारांना न्याय मिळवून देतील,” असा विश्वास यशवंत भोसले यांनी व्यक्त केला.

क्रांती दिनाच्या मेळाव्यात उपस्थित हजारो कामगारांना संबोधित करताना, कामगारांना न्याय मिळेपर्यंत राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा लढा सुरूच राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

— यशवंत भोसले, अध्यक्ष, राष्ट्रीय श्रमिक आघाडी, महाराष्ट्र राज्य

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!