spot_img
spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवडमध्ये मोकाट कुत्र्यांचा चार वर्षांच्या चिमुकलीवर जीवघेणा हल्ला

मोकाट व हिंसक कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त करा, अन्यथा महापालिका मुख्यालयात कुत्रे सोडणार : नगरसेविका संगीता ताम्हाणे व युवानेते शरद ताम्हाणे यांचा इशारा

पिंपरी-चिंचवड : शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच समस्येची गंभीर प्रचिती म्हेत्रे वस्ती परिसरात काल दुपारी आली. घराबाहेर खेळत असलेल्या अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मुलीला गंभीर दुखापत झाली असून, परिसरातील नागरिकांनी धाव घेत कुत्र्यांना पळवून लावल्याने मोठा अनर्थ टळला.

दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चिमुकली घराबाहेर खेळत असताना मोकाट कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तत्काळ धाव घेत कुत्र्यांना पळवून लावले आणि मुलीची सुटका केली. मात्र या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोकाट कुत्र्यांच्या दहशतीचे गांभीर्य पुन्हा एकदा समोर आले आहे.

मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासन अपयशी?

पिंपरी-चिंचवड शहरात अनेक भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचे मोठमोठे कळप दिसून येत आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यांवरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांचा पाठलाग करणे, नागरिकांच्या अंगावर धावून जाणे, लहान मुलांवर भुंकत हल्ला करण्याचा प्रयत्न करणे, वाहनांच्या मागे धावणे अशा घटना सातत्याने घडत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

विशेषतः वस्ती परिसर, सोसायट्या, शाळा, उद्याने, बाजारपेठा आणि कचरा साठवणूक होणाऱ्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कचऱ्याच्या ढिगांमुळे कुत्र्यांना खाद्य सहज उपलब्ध होत असल्याने त्यांची संख्या आणि आक्रमकता वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

फक्त कारवाईच्या घोषणा नकोत; ठोस उपाययोजना करा

मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्ष मैदानात उतरून ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणणे, त्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण, आजारी व हिंसक कुत्र्यांबाबत तातडीने उपाययोजना करणे तसेच नागरिकांच्या तक्रारींसाठी प्रभावी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.

एखाद्या नागरिकावर हल्ला झाल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा हल्ला होण्यापूर्वीच प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

‘कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा महापालिका मुख्यालयात सोडू’

या गंभीर घटनेनंतर परिसरातील राष्ट्रवादीच्या नगरसेविका सौ. संगीता नानी प्रभाकर ताम्हाणे यांनी महापालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मोकाट आणि हिंसक कुत्र्यांचा तातडीने कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली.

“नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईपर्यंत प्रशासन वाट पाहणार आहे का? लहान मुलांवर कुत्र्यांचे हल्ले होण्याची वेळ आली आहे. महापालिका प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने कारवाई करावी. अन्यथा परिसरातील मोकाट कुत्रे पकडून महापालिकेच्या मुख्य इमारतीतील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये सोडण्यात येतील,” असा इशारा राष्ट्रवादी च्या नगरसेविका संगीता नानी ताम्हाणे यांनी दिला.

युवानेते शरद ताम्हाणे यांनीही प्रशासनाला थेट इशारा देत मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या जीविताशी संबंधित असलेल्या या प्रश्नावर प्रशासनाने आणखी चालढकल केल्यास मोकाट कुत्रे महापालिका इमारतीत आणून सोडले जातील, असा इशारा त्यांनी दिला.

चिमुकलीवरील हल्ल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या हल्ल्यामुळे आता नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे. उद्या एखाद्या शाळकरी मुलावर, ज्येष्ठ नागरिकावर किंवा दुचाकीस्वारावर मोठा हल्ला झाला आणि जीवितहानी झाली, तर त्याची जबाबदारी कोणाची? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

नागरिकांच्या करातून महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो; मात्र नागरिकांच्या मूलभूत सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडण्यात प्रशासन कमी पडत असेल, तर त्याचा जाब प्रशासनाला द्यावाच लागेल, अशी भावना परिसरातून व्यक्त होत आहे.

 महापालिका प्रशासनाने तातडीने विशेष मोहीम राबवून मोकाट व हिंसक कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!