म्हाळुंगे | पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
बोअरची मोटार काढून नेल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून चौघांनी एका कुटुंबावर हल्ला केल्याची घटना म्हाळुंगे येथे घडली. या हल्ल्यात महिलेच्या मुलाला लोखंडी हत्याराने मारहाण करून जखमी करण्यात आले, तसेच त्याचा आयफोन फोडून नुकसान करण्यात आल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजश्री कुंदन रावत (वय ४२) या ६ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास उत्तम स्वीट होमसमोर असताना राहुल बाळू पवार (२७), रमेश बाळू पवार (२५), आस्लम शेख आणि सम्राट शिंदे यांनी त्यांना व त्यांचे पती कुंदन रावत, मुलगे हर्ष (१९) व वंश (१६) यांना शिवीगाळ करून हाताने, लाथाबुक्यांनी तसेच लाकडी बांबूने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यावेळी आरोपी क्रमांक एक राहुल पवार याने हर्ष यांच्या डोक्यात, गालावर व उजव्या खांद्यावर लोखंडी हत्याराने वार करून त्यांना जखमी केले. तसेच त्यांचा आयफोन मोबाईल फोडून नुकसान केल्याचा आरोप आहे.
भांडण सोडविण्यासाठी आलेल्या लक्ष्मी मारुती साळे, अर्जन साळे आणि शुभांगी किशोर पवार यांनाही हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३२४(४), ३(५) अन्वये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोउपनि. बत्तीशे करीत आहेत.



