प्रतिनिधी | युनूस खतीब
सायबर फसवणुकीसाठी स्वतःचे बँक खाते उपलब्ध करून देत तब्बल २२ लाख ७४ हजार ६४० रुपयांची वादग्रस्त रक्कम स्वीकारल्याप्रकरणी दोन तरुणांविरोधात दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सात नागरिकांच्या सायबर फसवणुकीशी या खात्याचा संबंध आढळल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
प्रतिक मोहन घुले (वय २२, रा. बोपखेल) आणि श्रीतेज नाना बुलाखे (वय २१, रा. गायकवाडनगर, दिघी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई वैभव गोरख काकडे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी प्रतिक याच्या नावावरील बँक खात्यावर देशातील सात नागरिकांच्या सायबर फसवणुकीशी संबंधित २२ लाख ७४ हजार ६४० रुपये ४८ पैसे जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. श्रीतेज याने प्रतिकशी संपर्क साधून बँक खाते वापरण्यास दिल्यास २५ हजार रुपये कमिशन देण्याचे सांगितल्याचा आरोप आहे.
मोबाईल तपासणीत श्रीतेज व त्याचे इतर साथीदार विविध व्यक्तींशी संपर्क साधून सायबर फसवणुकीसाठी बँक खाती उपलब्ध करून देत असल्याचेही निदर्शनास आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगताप करीत आहेत.



