प्रतिनिधी | युनूस खतीब
हॉटेलचे ऑनलाइन पेमेंट स्वीकारण्यासाठी विश्वासाने दिलेल्या मोबाईलचा गैरवापर करून ५३ हजार रुपये काढून घेतल्यासह देणी देण्यासाठी दिलेल्या ३५ हजार रुपयांच्या रोख रकमेचा अपहार केल्याचा प्रकार हिंजवडी येथे उघडकीस आला आहे. मोबाईलसह एकूण ९३ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावीर भागवत पवार (रा. उपळाई, ता. माढा, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मोनिका सचिन वाडकर (वय ४३, व्यवसाय वकीली, रा. बाणेर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, हिंजवडी-माण रोडवरील पांडवनगर येथील खानदेश हॉटेलच्या काउंटरवर ऑनलाइन पेमेंट स्वीकारण्यासाठी सुमारे पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल आरोपीकडे विश्वासाने सोपविण्यात आला होता. आरोपीने या मोबाईलचा वापर करून वेगवेगळ्या ठिकाणी ५३ हजार रुपये काढल्याचा आरोप आहे.
तसेच इतरांची देणी देण्यासाठी त्याच्याकडे सोपविलेली ३५ हजार रुपयांची रोख रक्कमही त्याने परत न करता अपहार केला. मोबाईल, त्याद्वारे काढलेली रक्कम आणि रोख रक्कम असा एकूण ९३ हजार रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५१५/२०२६ भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२) अंतर्गत दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.



