शबनम न्यूज | प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक १३ मधील निगडी सेक्टर क्रमांक २२, संग्रामनगर झोपडपट्टी, श्रमिकनगर, राहुलनगर, फातिमा मस्जिद परिसर तसेच १ ते १५ बिल्डिंग परिसरात दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून घरांमध्ये शिरत असल्याने नागरिकांना मोठ्या आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. घरातील कपडे, अन्नधान्य, घरगुती साहित्याचे नुकसान होत असून नागरिकांची सुरक्षितताही धोक्यात येत आहे.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महापौरांकडे निवेदन देण्यात आले. राहुलनगर ते निगडी स्मशानभूमीपर्यंत कॅन्टोन्मेंट (मिलिटरी) माळरानावरून येणारे पावसाचे पाणी थेट स्मशानभूमीमागील नाल्यात वळविण्यासाठी मोठ्या पावसाळी नाल्याची उभारणी करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
याचवेळी पीसीएमसी कॉलनीतील जीर्ण झालेल्या इमारतींना महानगरपालिकेकडून देण्यात आलेल्या नोटिसींचा विषयही महापौरांसमोर मांडण्यात आला. या इमारतींची संपूर्ण दुरुस्ती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनेच करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.
महापौरांनी संबंधित परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी नागरिकांना आश्वासन देताना सांगितले की, “पीसीएमसी कॉलनीतील सर्व जीर्ण इमारतींची आवश्यक दुरुस्ती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येईल.”
या पाहणी दौऱ्यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजू केरप्पा गायकवाड, अक्षय करंडे, प्रबुद्ध कांबळे, शेहना हाजी शेख, अल्ताफभाई शेख, नजीरभाई शेख, गणेश वाघमारे, मंगेश जाधव, चनालबाबी अल्ताफ शेख, रेखा सूर्यवंशी, दिपाली जाधव, रेखा भोसले, सुवर्णा सूर्यवंशी तसेच परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौरांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वेळ काढून प्रत्यक्ष दौरा केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले. दरवर्षीच्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करून पावसाळी नाल्याचे काम तातडीने सुरू करावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.



