शबनम न्यूज | प्रतिनिधी
घरातील तब्बल २१ लाख २५ हजार ६०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून त्यांच्या जागी नकली सोन्याचे दागिने ठेवत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार गहुंजे येथील लोढा बेलमेन्डो सोसायटीमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात मध्य प्रदेशातील २७ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिषेक लाखनसिंग सेगर (वय २७, रा. आदर्श मेघदूतनगर, इंदूर, मध्य प्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ५८ वर्षीय महिलेने शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला गहुंजे येथील लोढा बेलमेन्डो सोसायटीमध्ये वास्तव्यास आहेत. १० मे ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आरोपीने फिर्यादी यांच्या घरातून त्यांच्या संमतीशिवाय आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप आहे.
आरोपीने घरातील एकूण २१ लाख २५ हजार ६०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लबाडीच्या उद्देशाने चोरले. मात्र चोरी लवकर लक्षात येऊ नये यासाठी त्याने आणखी एक शक्कल लढविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चोरलेल्या खऱ्या सोन्याच्या दागिन्यांच्या जागी नकली सोन्याचे दागिने लाकडी कपाटात ठेवून महिलेची फसवणूक करण्यात आली.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.५२ वाजता शिरगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०६ आणि ३१८(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केद्रे करीत आहेत.



