spot_img
spot_img
spot_img
spot_img

कार बाजूला घेण्यावरून हॉटेल व्यावसायिकाला दांडके, सिमेंट ब्लॉकने मारहाण

शबनम न्यूज | प्रतिनिधी

ट्रॅक्टरला रस्ता देण्यासाठी कार बाजूला घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादात हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या कामगाराला लाथाबुक्क्यांसह लाकडी दांडके आणि सिमेंट ब्लॉकने मारहाण केल्याची घटना वाकड येथे घडली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या व्यावसायिकाच्या पत्नीला धक्काबुक्की करण्यात आली. तसेच हॉटेलवर दगडफेक केल्याचाही आरोप आहे.

ही घटना ३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दत्त मंदिर रोडवरील उत्कर्ष चौकात, दुर्गा हॉटेलसमोर घडली.

याप्रकरणी तेजस अनिल भागडे (वय ३६, व्यवसाय हॉटेल, रा. निसर्ग निर्मिती, कोकणे चौक, पिंपळे सौदागर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोमेश्वर साहेबराव तोरगे (वय २२, रा. गणेशनगर, थेरगाव) आणि प्रज्वल महादेव मगर (वय अंदाजे १८, रा. साईबाबानगर, दत्त मंदिर रोड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भागडे हे त्यांची पत्नी गौरी, मावशी जया मोरे आणि मुलगी श्रीजा यांच्यासह कारमध्ये बसले होते. त्यांनी हॉटेलमधील कामगार वैभव लक्ष्मण उकंडे याला पाण्याची बाटली आणण्यास सांगितले होते. त्याचवेळी कारच्या पाठीमागून एक ट्रॅक्टर आला.

ट्रॅक्टरला बाजूने जाण्यासाठी जागा असतानाही कार बाजूला घेण्याच्या कारणावरून आरोपी आणि फिर्यादी यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपींनी भागडे आणि वैभव यांना शिवीगाळ करत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच लाकडी दांडके आणि सिमेंट ब्लॉकने मारहाण करून त्यांना दुखापत करण्यात आली.

भांडण सुरू असताना भागडे यांच्या पत्नी गौरी या मध्यस्थी करून भांडण सोडविण्यासाठी आल्या. त्यावेळी त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी हॉटेलवर दगडफेक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी वाकड पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना समजपत्र देऊन सोडण्यात आले आहे.

पुढील तपास सहायक पोलीस फौजदार नांगरे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!