spot_img
spot_img
spot_img
spot_img

सायबर सुरक्षा तंत्रज्ञान शिक्षण ही काळाची गरज – डॉ पराग काळकर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

आजच्या काळामध्ये माणसाचे जीवन हे पूर्णतः तंत्रज्ञानाने व्यापून टाकलेले आहे. माणूस कुठेही गेला तरी त्याच्यासोबत मोबाईल सारखे तंत्रज्ञान कायमस्वरूपी असते. त्यामुळे, माणसाची सर्व माहिती तंत्रज्ञानाकडे असते. गुन्ह्याचे स्वरूप बदलल्यामुळे तपास यंत्रणा आणि पद्धतही बदलणे गरजेचे असून सायबर सुरक्षा तंत्रज्ञानासंदर्भात माहिती आणि शिक्षण ही आता काळाची गरज बनली आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी व्यक्त केले.

ट्रान्सेडेंटल टेक्नॉलॉजीज, तंत्रज्ञान विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुनीत बालन ग्रुप आणि न्यूलिफ लाईफ स्पेसेस तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जिऑलॉजी विभागामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘इन्व्हेस्टीगेशन मास्टरक्लास’ सायबर सुरक्षा संदर्भातील कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते झाले. जीएसटी विभागाच्या अपर महासंचालक (ए.डी.जी, डी.जी.जी.आय) वृंदाबा गोहिल, पुणे एटीएसचे एसपी संभाजी कदम, डॉ. आरती दातार, माधुरी सातपुते , लीना सातपुते, प्राजक्ता गिरी, ट्रान्सेडेंटल टेक्नॉलॉजीसचे प्रमुख केतन अत्रे आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. पराग काळकर म्हणाले, माणसाच्या बँकेतील व्यवहारापासून ते पर्यटन, दैनंदिन जीवन याची सर्व माहिती मोबाईलमध्ये रोजच्या रोज नोंद होत असते. परंतु अनेक जण याबद्दल अनभिज्ञ असतात. मोबाईल ही आज प्रत्येकाची गरज बनली आहे परंतु मोबाईल संदर्भात प्रत्येकालाच संपूर्णतः माहिती नाही, याचाच फायदा सायबर गुन्हेगार उचलतात आणि विशेषतः जेष्ठ नागरिकांची फसवणूक मोठ्या प्रमाणावर केली जाते. सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी त्याची संपूर्णतः माहिती असणे ही पहिली पायरी आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या सायबर सिक्युरिटी तंत्रज्ञानासंदर्भात जनजागृती करणाऱ्या कार्यशाळांची गरज आहे. मोबाईलसारखे तंत्रज्ञान प्रत्येक माणूस कोणत्याही वयाचा असला तरी सोबत घेऊन फिरतो. मोबाईल ही गरज असली तरी त्याचे दुष्परिणाम काय आहेत हे अनेकांना माहिती नाही, त्याचे दुष्परिणामही प्रत्येकाने जाणून घेणे गरजेचे आहे. मोबाईल तंत्रज्ञान हे कशाप्रकारे हाताळावे याची जर सर्वसामान्यांना माहिती झाली तर मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असेही डॉ. पराग काळकर यांनी यावेळी सांगितले.

वृंदाबा गोहिल म्हणाल्या, सायबर गुन्हेगारी विरोधात तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी पुणे विद्यापीठ आणि ट्रान्सेडेंटल टेक्नॉलॉजीस यांनी एकत्र येऊन सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे. अशा प्रकारच्या अनेक उपक्रमांची गरज आहे. सायबर सुरक्षेसंदर्भात काम करणाऱ्या सर्व संस्थांनी एकत्र येऊन काम केले तर निश्चितच सायबर गुन्हेगारीवर आळा घातला जाऊ शकतो.
डॉ. आरती दातार म्हणाल्या, सायबर सुरक्षा संदर्भात तीन दिवस पूर्णतः प्रशिक्षण देण्यासंदर्भातली तंत्रज्ञान विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुढाकार घेऊन घेण्यात आलेली ही कार्यशाळा भारतामध्ये बहुतांश पहिलीच कार्यशाळा असावी. या कार्यशाळेचा सर्वांनी अधिकाधिक लाभ घेतला पाहिजे. कार्यशाळेमध्ये बोलताना कुंदन कुमार सराफ म्हणाले, आपल्या मोबाईल मध्ये कोणत्या प्रकारचे एप्लीकेशन डाउनलोड करायचे याची सतर्कता प्रत्येकाने बाळगली पाहिजे. ट्रू कॉलर सारखे एप्लीकेशन आपल्या मोबाईलची सर्व माहिती इतर ॲप्लिकेशन्सला विकतात. त्यामुळे, त्याचा वापर कोणीही करू नये तसेच भारतीय रेल्वेच्या आय.आर.सी.टी.सी. सारख्या वेबसाईटवर सायबर गुन्हेगारांनी हल्ला करून त्याची सर्व माहिती गुन्हेगारांना दिलेली आहे. त्यामुळे कोणत्याही वेबसाईट अथवा एप्लीकेशन मध्ये आपली पूर्णतः आणि विशेषतः गोपनीय माहिती देताना सतर्कता बाळगली पाहिजे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!