शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ‘अजातशत्रू – अजित दादा’ या कविता संग्रहाच्या मुखपृष्ठाचे अनावरण पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. लोककवी सीताराम नरके यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या व्यक्तिमत्त्व, कर्तृत्व आणि जनतेप्रती असलेल्या आत्मीयतेला शब्दबद्ध करणारा हा काव्यसंग्रह तयार केला आहे.
कवी नरके यांनी सांगितले की, २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात स्व. अजितदादा पवार यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय ६६ वर्षे, ६ महिने आणि ६ दिवस इतके होते. या संख्येतील “६” या अंकाशी साधर्म्य राखत या कविता संग्रहात एकूण ६६ कविता समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
या संग्रहातील “असे कसे गेलात हो, पोरकी करून माती” ही कविता विशेष भावस्पर्शी असून, कवी सीताराम नरके यांनी आतापर्यंत ६५ ठिकाणी तिचे सादरीकरण केले आहे. ज्या ठिकाणी विमान अपघात झाला तसेच ज्या ठिकाणी स्व. अजितदादा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्या ठिकाणी जाऊनही त्यांनी या कवितेद्वारे शब्दसुमनांजली अर्पण केली. तसेच राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीतही ही कविता सादर करण्यात आली.
या कविता संग्रहाला ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस प्रस्तावना लिहिणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
पत्रकार रोहित खर्गे यांनी एका कार्यक्रमात कवी सीताराम नरके यांची विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्याशी ओळख करून दिली होती. त्यानंतर २१ जुलै रोजी झालेल्या भेटीत भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते कविता संग्रहाच्या मुखपृष्ठाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी भाऊसाहेब भोईर म्हणाले, “अजितदादा हे केवळ शब्द देणारे नव्हते, तर दिलेला शब्द पाळणारे नेतृत्व होते. मी त्यांचा निष्ठावान कार्यकर्ता असून त्यांचे विचार आणि जनसेवेची परंपरा पुढे नेण्यासाठी माझे जीवन समर्पित करणार आहे.”
लवकरच भाऊसाहेब भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अजातशत्रू – अजित दादा’ या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.


