शबनम न्यूज | प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक १५ मधील नागरिकांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत उपलब्ध व्हावी, या उद्देशाने नगरसेविका तथा माजी उपमहापौर शैलजाताई मोरे आणि भाजयुमोचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप अविनाश मोरे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. निगडी-प्राधिकरण येथील त्यांचे जनसंपर्क कार्यालय २० जुलैपासून येत्या ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत तब्बल २४ तास खुले ठेवण्यात येणार आहे. नागरिकांच्या सेवेसाठी अशा प्रकारे सलग २४ तास जनसंपर्क कार्यालय सुरू ठेवण्याचा हा त्यांचा निर्णय शहरातील एक आगळावेगळा आणि लोकाभिमुख उपक्रम मानला जात आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून अतिवृष्टी, पाणी साचणे, झाडे कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे, रस्त्यांवरील अडथळे, ड्रेनेजच्या समस्या, आरोग्यविषयक अडचणी तसेच इतर आपत्कालीन प्रसंग अचानक उद्भवू शकतात. अशा वेळी नागरिकांना त्वरित मार्गदर्शन, संबंधित शासकीय यंत्रणांशी समन्वय आणि आवश्यक ती मदत मिळावी, यासाठी कार्यालयात कार्यकर्ते व पदाधिकारी चोवीस तास उपलब्ध राहणार आहेत.
कार्यालयामार्फत महापालिका, महावितरण, अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन तसेच इतर संबंधित विभागांशी तातडीने संपर्क साधून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नागरिकांनी कोणतीही अडचण अथवा आपत्कालीन माहिती त्वरित कार्यालयाशी संपर्क साधून कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत नगरसेविका तथा माजी उपमहापौर शैलजाताई मोरे म्हणाल्या, “लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी राहणे हे आमचे कर्तव्य आहे. विशेषतः पावसाळ्यात अनेक अनपेक्षित अडचणी निर्माण होतात. अशा वेळी नागरिकांना कोणत्याही क्षणी मदतीसाठी धावून जाणे, त्यांच्या समस्या संबंधित विभागांपर्यंत पोहोचवून त्या तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत जनसंपर्क कार्यालय २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.”
भाजयुमोचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे म्हणाले, “सार्वजनिक जीवनात जनसेवेलाच सर्वोच्च प्राधान्य आहे. संकटाची वेळ सांगून येत नाही. त्यामुळे दिवस असो किंवा रात्र, प्रभागातील नागरिकांना मदतीची गरज भासल्यास त्यांना तत्काळ प्रतिसाद मिळावा, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी कोणतीही अडचण निःसंकोचपणे कळवावी. प्रशासनाशी समन्वय साधून शक्य ती सर्व मदत करण्यासाठी आम्ही आणि आमची संपूर्ण टीम कायम तत्पर राहील.”
दरम्यान या उपक्रमामुळे प्रभाग क्रमांक १५ मधील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत, मार्गदर्शन आणि प्रशासनाशी जलद समन्वय मिळण्यास मोठी मदत होणार असून, नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.


