शबनम न्यूज | प्रतिनिधी
शहरातील नागरिकांना अखंडित, दर्जेदार व सुरक्षित वीजपुरवठा मिळावा, महापालिकेच्या पाणीपुरवठा व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांना आवश्यक वीजजोडणी वेळेत उपलब्ध व्हावी तसेच महावितरणकडे प्रलंबित असलेल्या विविध कामांचा तातडीने निपटारा व्हावा, या उद्देशाने महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर आढावा बैठक पार पडली.
बैठकीत रावेत परिसरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रे (WTP), सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP), जॅकवेल व पंप हाऊससाठी आवश्यक नवीन वीजजोडण्या, ट्रान्सफॉर्मर उभारणी, डीपी, फीडर पिलर, आरएमयू, मीटर बसविणे, अंदाजपत्रके मंजुरीतील विलंब, डबल रन केबल, पीडी मीटर, वीजबिलाशी संबंधित तक्रारी, रस्ते खोदाईनंतरचा समन्वय तसेच विविध प्रलंबित प्रस्तावांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
महापालिकेच्या विकासकामांमध्ये कोणताही विलंब होणार नाही यासाठी महावितरणने आवश्यक तांत्रिक मंजुरी व अंदाजपत्रके वेळेत उपलब्ध करून द्यावीत, नवीन वीजजोडण्या आणि ट्रान्सफॉर्मरची कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत तसेच पाणीपुरवठा आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचा वीजपुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
तसेच नागरिकांच्या वीजपुरवठा, मीटर, बिलिंग व इतर तक्रारींचे तातडीने निराकरण करावे, रस्ते खोदाईपूर्वी महापालिकेशी समन्वय साधावा, कामे पूर्ण झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करण्याची कार्यवाही वेळेत करावी आणि भविष्यात अशा समस्यांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी प्रभावी नियोजन करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या.
महापौर रवि लांडगे यांनी शहरातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा मिळणे ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगत, नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करून महावितरणने अधिक जबाबदारीने काम करावे, असे निर्देश दिले. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेच्या विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक वीजविषयक मंजुरी, वीजजोडण्या आणि तांत्रिक प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला.
बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी सर्व प्रलंबित कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. महापालिका आणि महावितरण यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करून नागरिकांना विश्वासार्ह वीजसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
बैठकीस उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे तसेच महावितरणचे मुख्य अभियंता सुनील काकडे, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे, कार्यकारी अभियंता लहानू विश्वनाथ तसेच महावितरणचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


