२२ ते २७ जुलैदरम्यान विविध सामाजिक उपक्रम; शासन सेवा, आरोग्य, स्वच्छता, वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांचा सत्कार
शबनम न्यूज | प्रतिनिधी
लोकनेते तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने २२ ते २७ जुलै २०२६ या कालावधीत “जनसेवा सप्ताह” आयोजित करण्यात आला आहे. “माणसातला देवमाणूस” या संकल्पनेतून विविध सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
जनसेवा सप्ताहात शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन, एसटी डिजिटल कार्ड नोंदणी शिबिर, भव्य वृक्षारोपण, मोफत महाआरोग्य शिबिर, स्वच्छता अभियान, दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि करिअर मार्गदर्शन, तसेच एसटी डिजिटल कार्ड वाटप असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या उपक्रमांद्वारे सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ, आरोग्य सुविधा, पर्यावरण संवर्धन, स्वच्छतेचा संदेश आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
जनसेवा सप्ताहाचे आयोजन विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून नगरसेवक शेखर चिंचवडे यांच्या पुढाकारातून विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी आयोजकांनी स्व. अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख विचारांना अभिवादन करत, त्यांच्या कार्याचा वारसा जनसेवेतून पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.


