spot_img
spot_img
spot_img

सायबर फसवणुकीसाठी ‘म्युल अकाउंट’ वापरल्याप्रकरणी चिंचवडमधील तरुणावर गुन्हा

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

सायबर फसवणुकीतील पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी बँक खाते उपलब्ध करून दिल्याप्रकरणी चिंचवड येथील एका तरुणाविरुद्ध सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपासात संबंधित खात्यातून लाखो रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे समोर आले आहे.

सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११२(२), ६१(२), ३१८(४) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२६ ते १३ जुलै २०२६ या कालावधीत चिंचवड येथील राहुल रामा राठोड (वय २८) याने बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये Master Rahul Rama Rathod या नावाने खाते उघडले होते. आरोपीने आपल्या साथीदारांशी संगनमत करून सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी हे खाते वापरण्यास दिल्याचा आरोप आहे.

तपासादरम्यान या खात्यातून एकूण ३४ लाख ३७ हजार ८१५ रुपयांचे व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच देशातील विविध भागांतील ७ नागरिकांच्या सायबर फसवणुकीच्या तक्रारींशी या खात्याचा संबंध आढळून आला आहे. संबंधित तक्रारींमधील रक्कम या खात्यात जमा झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

सायबर गुन्हेगारांच्या टोळीचा सदस्य म्हणून आरोपीने स्वतःचे बँक खाते वापरण्यास दिले आणि आर्थिक व्यवहार सुलभ केले, असा आरोप पोलिसांनी केला आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदार समीर बाळासाहेब घाडगे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के करीत आहेत.

सायबर पोलिसांचा इशारा

सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कमिशन, नोकरी, गुंतवणूक किंवा इतर आमिषांच्या बदल्यात कोणालाही स्वतःचे बँक खाते, एटीएम कार्ड, पासबुक, इंटरनेट बँकिंग माहिती किंवा सिमकार्ड देऊ नये. असे केल्यास संबंधित व्यक्तीवरही सायबर गुन्ह्यात सहभागी असल्याप्रमाणे कायदेशीर कारवाई होऊ शकते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!