पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ५ लाख ६३ हजार ५०० रुपयांच्या ऑनलाइन फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या माध्यमातून देशातील दोन नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सायबर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, आरोपीने आपल्या साथीदारांसह संगनमत करून देहूरोड येथील एका व्यक्तीकडून “ABHIJIT WEB DEVELOPER” या नावाने असलेले बँक ऑफ महाराष्ट्रचे खाते वैयक्तिक कामासाठी घेतले. त्यानंतर या खात्यातून ५४ लाख ६२ हजार ५५३ रुपयांचे संशयास्पद व्यवहार करण्यात आले. या व्यवहारांच्या माध्यमातून देशातील दोन नागरिकांची एकूण १.०५ कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस करीत आहेत.
सायबर गुन्हेगारांकडून बँक खाती भाड्याने किंवा वापरासाठी घेऊन आर्थिक फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी आपली बँक खाती कोणालाही वापरण्यास देऊ नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


