पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पुनावळे येथे छापा टाकून पॉपी स्ट्रॉ (डोडा अफू) विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत अंमली पदार्थांसह मोबाईल आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाराम जगाराम चौधरी (वय ४२, रा. पुनावळे) याला दुलीफ इन्फिनिटी लेबर कॅम्प परिसरातून ताब्यात घेण्यात आले. आरोपीच्या ताब्यातून २०० ग्रॅम डोडा अफू वनस्पतीच्या सुकवलेल्या बोंडांचा चुरा (पॉपी स्ट्रॉ) जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ६३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्राथमिक चौकशीत आरोपीने हा अंमली पदार्थ सुमेर बिश्नोई नावाच्या व्यक्तीकडून मिळाल्याची माहिती दिली आहे. संबंधित संशयिताचा शोध सुरू असून त्याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि कुंभार करीत आहेत.
शहरात अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून अशा कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


