राष्ट्रवादी च्या नगरसेविका योगिता महेश बारणे यांनी सभा गाजवली
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकाची सर्वसाधारण सभा 15 जुलै रोजी महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या प्रारंभीच 8 जुलै रोजी मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प परिसरात घडलेल्या भीषण दुर्घटनेचा मुद्दा गाजला. या दुर्घटनेत 9 कामगारांचा मृत्यू झाल्याने सभागृहात तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या आणि दोषींवर कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी सर्वच नगरसेवकांनी केली.
या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका योगिता महेश बारणे यांनी अत्यंत प्रभावी भाषण करत मोशी दुर्घटनेतून संपूर्ण समाजाने धडा घेण्याची गरज असल्याचे सांगितले. “कचरा व्यवस्थापन हा प्रश्न केवळ कचरा उचलण्यापुरता मर्यादित नाही; आता कचरा निर्मितीच कमी करण्याची राष्ट्रीय चळवळ उभी करण्याची वेळ आली आहे,” असे त्या म्हणाल्या.
योगिता बारणे यांचा इशारा सभागृहातील प्रमुख मुद्दा
“मोशी दुर्घटना ही केवळ एक अपघात नाही, तर आपल्या कचरा व्यवस्थापन व्यवस्थेतील गंभीर त्रुटींचा इशारा आहे. अधिक कचरा डेपो हा उपाय नाही; कमी कचरा हाच खरा उपाय आहे.”
नगरसेविका योगिता महेश बारणे यांनी आपल्या भाषणात जगभरातील यशस्वी उदाहरणांचा संदर्भ देत सांगितले की, शून्य कचरा (Zero Waste) ही संकल्पना अनेक देशांनी प्रभावीपणे राबवली आहे.
जपान मध्ये नागरिक स्वतः काटेकोरपणे कचऱ्याचे वर्गीकरण करतात,दक्षिण कोरिया मध्ये अन्नकचऱ्याचे वजन करून शुल्क आकारले जाते; त्यामुळे अन्न वाया जाणे कमी झाले आहे.स्वीडन मध्ये कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करण्याची प्रभावी व्यवस्था उभी केली आहे.जर्मनी मध्ये उत्पादक कंपन्यांवर पुनर्वापराची जबाबदारी टाकण्यात आली आहे.सिंगापूर मध्ये स्वच्छता ही केवळ सरकारी योजना नसून प्रत्येक नागरिकाची जीवनशैली बनली आहे.
“या देशांनी दाखवून दिले आहे की, कायदे जितके महत्त्वाचे आहेत तितकीच नागरिकांची मानसिकता आणि सहभाग महत्त्वाचा असतो. ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ ही भावना प्रत्येक नागरिकामध्ये निर्माण झाली पाहिजे,” असे योगिता बारणे यांनी नमूद केले.
प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नागरिकांना आर्थिक प्रोत्साहन देण्याची अभिनव कल्पनाही त्यांनी मांडली. सध्या प्लास्टिक वेस्टचा दर सुमारे 20 रुपये प्रति किलो असून तो 100 रुपये प्रति किलोपर्यंत वाढविण्याच्या स्वरूपाच्या योजना राबविल्या, तर प्रत्येक घरातील व्यक्ती स्वतःहून प्लास्टिक गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावेल आणि महापालिकेच्या यंत्रणेवरील ताणही कमी होईल, असे त्यांनी सांगितले.
आपल्या भाषणाच्या शेवटी बारणे यांनी मोशी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व कामगारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. “भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी केवळ प्रशासन नव्हे, तर संपूर्ण समाजाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत चिंता
याच वेळी त्यांनी पर्यावरण आणि सामाजिक प्रश्नांवर काम करणारे प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते व वैज्ञानिक
सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या उपोषणाचा मुद्दाही उपस्थित केला. “उपोषणाला 18 ते 19 दिवस पूर्ण झाले असून त्यांची प्रकृती खालावत आहे. त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी केंद्र सरकारने तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत,” अशी विनंती त्यांनी केली.


