शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका महिलेला अटक केली आहे. या कारवाईत अमली पदार्थांसह तिच्याकडील कारही जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिxx भारत निमजे (वय ३५, रा. तळेगाव दाभाडे) हिला चिंचवड येथील काळभोर नगर परिसरात सह्याद्री इंडस्ट्रीजसमोरील सार्वजनिक रस्त्यावरून ताब्यात घेण्यात आले. तिच्या झडतीदरम्यान १८ हजार २०० रुपये किमतीची ३.६४ ग्रॅम एमडी पावडर आढळून आली.
याशिवाय आरोपीकडील सुमारे ५ लाख रुपये किमतीची मारुती वॅगनआर कार (एमएच १४ केजे ५००४) देखील जप्त करण्यात आली. पोलिसांच्या मते, आरोपी ही अमली पदार्थ विक्रीसाठी बेकायदेशीररित्या स्वतःच्या ताब्यात बाळगत होती.
याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि अतिग्ने करीत आहेत.
शहरात वाढत्या अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


