पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने तळेगाव दाभाडे येथील एका लॉजवर छापा टाकून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून लॉज मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना मुंबई-पुणे महामार्गावरील तळेगाव खिंड परिसरातील युवा लॉज येथे सोमवारी (दि. १३ जुलै) सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आरोपी महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
कारवाईदरम्यान हेमंत नांजे गौडा (वय २३) या लॉज मॅनेजरला अटक करण्यात आली. तर लॉज चालक मन्जे गौडा याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ८ हजार ३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या अधिकारी श्रद्धा राजेश भरगुडे यांच्या फिर्यादीवरून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


