पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
देहूगाव परिसरात उसने घेतलेल्या पैशांच्या वादातून सख्ख्या भावाने भावाचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळीनगर, देहूगाव येथील संभाजी टिळेकर यांच्या खोलीत मंगळवारी (दि. १४ जुलै) पहाटे ५ ते ५.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी पश्नशाय राजेंद्र कुदळे (वय २०) याचा मोठा भाऊ विनायक राजेंद्र कुदळे याच्याकडे लोक उसने दिलेले पैसे मागण्यासाठी वारंवार येत असल्याने दोघांमध्ये वाद झाला.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर संतापलेल्या आरोपीने कांदा कापण्याच्या चाकूने विनायकच्या छातीच्या डाव्या बाजूस वार केला. गंभीर जखमी झालेल्या विनायकचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
या प्रकरणी कुंदन हिरालाल भगत (वय २३) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.


