पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
रावेत पोलिसांनी तडीपार आदेशाचे उल्लंघन करून कोयता बाळगणाऱ्या एका सराईत आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे संबंधित आरोपीला यापूर्वीच पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जुलै रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास शिंदेवस्ती ते गणेशनगर मार्गावरील व्हिक्टोरी क्रिकेट अकॅडमीसमोरील मोकळ्या जागेत आरोपी प्रेम गोरक्ष साकोरे (वय २४, रा. किवळे) हा संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. झडतीदरम्यान त्याच्याकडे ८५० रुपये किंमतीचा लोखंडी कोयता सापडला.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी लागू केलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करत आरोपी कोयता बाळगत होता. तसेच त्याच्यावर यापूर्वी तडीपारची कारवाई करण्यात आली असूनही तो बंदी असलेल्या क्षेत्रात वावरत असल्याचे तपासात समोर आले.
या प्रकरणी रावेत पोलिसांनी भारतीय शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


