शबनम न्यूज | प्रतिनिधी
योगदान प्रतिष्ठानच्या वतीने प्रभाग क्रमांक १८ मधील इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हा कार्यक्रम दिनांक ९ जुलै २०२६ रोजी नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.
या समारंभात इयत्ता दहावीतील १७४ तर इयत्ता बारावीतील ६८ अशा एकूण २४२ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करताना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शनही करण्यात आले.

पुणे शहर सजग नागरिक मंचाचे प्रमुख व नामवंत मार्गदर्शक विवेकजी वेलणकर यांनी विद्यार्थ्यांना करिअर, उच्च शिक्षण व स्पर्धात्मक क्षेत्रातील संधींबाबत सहज आणि सोप्या शब्दांत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रपती पुरस्कार विजेते ह.भ.प. किसन महाराज चौधरी यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत कठोर परिश्रम, संस्कार आणि ध्येयवेड या गुणांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी योगदान प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश भोईर यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.
या प्रसंगी पिंपरी-चिंचवड शिक्षण समिती अध्यक्षा रवीना आंघोळकर, माजी महापौर अपर्णाताई डोके, नगरसेविका मनीषाताई चिंचवडे, भाजपचे वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्रजी देशपांडे, क्रांतिवीर स्मारक समितीचे सदस्य गतिरामजी भोईर, रवींद्र प्रभुणे, सोनाताई गडदे, दीपालीताई कलापुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबर चिंचवडे यांनी केले, तर विजयकुमार बोरसे सर यांनी आभार प्रदर्शन केले.
विद्यार्थ्यांचा उत्साह, पालकांची मोठी उपस्थिती आणि मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन यामुळे हा सत्कार समारंभ अतिशय उत्साही व सकारात्मक वातावरणात संपन्न झाला.



