spot_img
spot_img
spot_img
spot_img

शालेय विद्यार्थ्यांनी जाणून घेतले अग्निसुरक्षेचे महत्त्व

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत शालेय विद्यार्थ्यांमध्ये अग्निसुरक्षा व आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सिटी प्राईड स्कूल, मोशी येथील विद्यार्थ्यांसाठी मोशी अग्निशमन केंद्र येथे अग्निसुरक्षा साहित्य प्रदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी अग्निशमन जवानांनी विद्यार्थ्यांना अग्निशमन विभागाच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. तसेच अग्निशमनासाठी वापरण्यात येणारी विविध उपकरणे, बचाव साहित्य, अग्निशमन वाहनांची वैशिष्ट्ये व त्यांचा प्रत्यक्ष वापर याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. आग लागल्यास घ्यावयाची खबरदारी, आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षितपणे बाहेर पडण्याच्या पद्धती, प्राथमिक उपाययोजना आणि तात्काळ मदतीसाठी अग्निशमन विभागाच्या १०१ या क्रमांकावर संपर्क साधण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी अग्निशमन वाहनांची पाहणी केली तसेच विविध अग्निशमन साहित्याची माहिती प्रत्यक्ष अनुभवातून जाणून घेतली. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत अग्निसुरक्षेबाबत विविध प्रश्न विचारले, ज्यांची उत्तरे अग्निशमन जवानांनी दिली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अग्निसुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद देण्याबाबत जनजागृती निर्माण झाली असून सुरक्षिततेची जाणीव अधिक दृढ झाली. शालेय स्तरावर अग्निसुरक्षेची संस्कृती रुजविण्यासाठी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत अशा प्रकारचे जनजागृती उपक्रम यापुढेही राबविण्यात येणार आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!