spot_img
spot_img
spot_img
spot_img

आंदोलनाच्या नावाखाली देशविरोधी विचारांना खतपाणी घालणे खपवून घेतले जाणार नाही – आमदार अमित गोरखे

शबनम न्यूज | प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी तसेच भारताच्या इतिहासाविषयी कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी अभिजीत दीपके यांनी वस्तुनिष्ठ अभ्यास करणे आवश्यक आहे. आंदोलनाच्या नावाखाली अराजकता माजवणे, निराधार आरोप करणे आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठी दिशाभूल करणारी विधाने करणे योग्य नाही, असे प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी केले.

छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह-सरकार्यवाह श्री. अतुलजी लिमये यांनी सीजेपी (CJP) आंदोलनासंदर्भात भूमिका मांडल्यानंतर अभिजीत दीपके यांनी केलेल्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना आमदार गोरखे बोलत होते.

संघाचे शंभर वर्षांचे राष्ट्रकार्य
आमदार अमित गोरखे म्हणाले की, श्री. अतुलजी लिमये यांनी संबंधित आंदोलनाबाबत अभ्यासपूर्ण आणि तर्कशुद्ध विवेचन केले. मात्र, त्यावर प्रतिक्रिया देताना अभिजीत दीपके यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी संघाने अवमान केल्याचा आणि महात्मा गांधी यांच्या हत्येत संघाचा सहभाग असल्याचा जुना व निराधार आरोप पुन्हा केला. अशा प्रकारची विधाने करण्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास, भारताची संस्कृती आणि संघाचे शंभर वर्षांचे राष्ट्रकार्य यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

समाजात संभ्रम निर्माण करणे अयोग्य
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या शतकभरात भारतीय संस्कृती, सामाजिक समरसता आणि राष्ट्रभावना दृढ करण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. संघामधील सरसंघचालकांनंतर सरकार्यवाह आणि अखिल भारतीय सह-सरकार्यवाह ही अत्यंत जबाबदारीची पदे आहेत. अशा जबाबदार पदावरील व्यक्तींनी मांडलेल्या विचारांवर टीका करताना किमान तथ्यांचा आधार असणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आरोप झाले होते; मात्र भारतीय न्यायव्यवस्थेने संघाला दोषमुक्त केले. भारतीय संविधानावर आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचा दावा करणाऱ्यांनी हा ऐतिहासिक संदर्भ विसरू नये, असा सवालही आमदार गोरखे यांनी उपस्थित केला.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संघाने अपमान केल्याचा आरोपही वस्तुस्थितीला धरून नसल्याचे सांगत आमदार गोरखे म्हणाले की, इतिहासात महात्मा गांधी यांनी १९३४ मध्ये वर्धा येथील संघ शिबिराला भेट दिली होती. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही संघाच्या शाखेला भेट दिल्याचे १९४० मधील ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध आहेत. त्यामुळे इतिहासाचा अपूर्ण किंवा सोयीस्कर अर्थ लावून समाजात संभ्रम निर्माण करणे अयोग्य आहे.

दिल्लीतील आंदोलनाचा उल्लेख करताना आमदार गोरखे म्हणाले की, त्या आंदोलनात भारतविरोधी घोषणा, भारतीय संस्कृतीचा अवमान करणारी वक्तव्ये आणि देशाच्या नेतृत्वाविषयी अत्यंत खालच्या पातळीवरील भाषा वापरण्यात आली. आंदोलन हे लोकशाहीचे माध्यम असले तरी त्यातून देशविरोधी विचारांना खतपाणी घालणे किंवा समाजात तेढ निर्माण करणे कदापि स्वीकारार्ह नाही.

‘भारताची सांस्कृतिक परंपरा आणि राष्ट्रीय मूल्यांचे जतन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्याने कार्यरत आहे. त्यामुळे कोणतेही सार्वजनिक वक्तव्य करण्यापूर्वी इतिहास, संविधान, न्यायव्यवस्था आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा सखोल अभ्यास करावा,’ असे आवाहन आमदार अमित गोरखे यांनी अभिजीत दीपके यांना केले आहे. 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!