spot_img
spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाकडून पत्रकारांना रेनकोट वाटप

“पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी आणि कर्तव्यपूर्तीसाठी संघटनेचा उपक्रम”

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. समाजातील घडामोडींवर लक्ष ठेवून सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडण्याचे महत्त्वपूर्ण काम पत्रकार करत असतो. शासन, प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील दुवा म्हणून पत्रकाराची भूमिका अत्यंत जबाबदारीची आहे. कोणतीही नैसर्गिक आपत्ती, अपघात, गुन्हेगारी घटना, पूरस्थिती, आंदोलने, निवडणुका, सामाजिक उपक्रम किंवा विकासकामे असोत, पत्रकार प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहून वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवत असतो.

उन्हाळ्याचे तीव्र ऊन, मुसळधार पाऊस किंवा प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता पत्रकार आपले कर्तव्य बजावत असतो. विशेषतः पावसाळ्यात वार्तांकन करताना भिजणे, उपकरणांचे नुकसान होण्याचा धोका, वाहतुकीतील अडथळे आणि विविध गैरसोयींना सामोरे जावे लागते. या सर्व बाबींची जाणीव ठेवून पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाचे संस्थापक बापूसाहेब गोरे यांच्या संकल्पनेतून संघटनेच्या सर्व पत्रकार सदस्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.

हा उपक्रम संस्थापक बापूसाहेब गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी संघटनेच्या अध्यक्षा सायली कुलकर्णी, उपाध्यक्ष विनय लोंढे, उपाध्यक्ष रेहान सय्यद, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील कांबळे, सरचिटणीस संतोष जराड,चिटणीस मुकेश जाधव,सह कोषाध्यक्ष जितेंद्र गवळी, प्रसिद्धी प्रमुख युनूस खतीब, डिजिटल मीडिया अध्यक्ष सुरज साळवे,प्रसाद बोरसे, अशोक लोखंडे,अमोल डंबाळे, शबनम सय्यद,विश्वास शिंदे यांच्यासह संघटनेचे अनेक पत्रकार सदस्य उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी पत्रकारांच्या हितासाठी अशा कल्याणकारी उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. पत्रकारांना केवळ सन्मानच नव्हे, तर त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि कामकाज सुलभ होण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

पत्रकार हा केवळ बातमी देणारा नसून समाजातील अन्यायाला वाचा फोडणारा, विकासकामांवर लक्ष ठेवणारा, प्रशासनाला जबाबदार धरणारा आणि नागरिकांच्या प्रश्नांना शासनापर्यंत पोहोचवणारा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे पत्रकारांच्या आरोग्याची, सुरक्षिततेची आणि कामासाठी आवश्यक साधनसामग्रीची काळजी घेणे हे समाजाचेही कर्तव्य असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे पत्रकार सदस्यांनी स्वागत करत, भविष्यातही पत्रकारांच्या कल्याणासाठी अशाच विधायक योजना राबविण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!