पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी / युनूस खतीब
हिंजवडी परिसरात देशी दारूची अवैध विक्री करणाऱ्याविरोधात दारूबंदी पथकाने धडक कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत विविध ब्रँडच्या देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जुलै रोजी दुपारी सुमारे ३.३५ वाजता माण (ता. मुळशी) येथील बोडकेवाडी लेबर कॅम्प परिसरातील गणेश सुपर मार्केट दुकानाबाहेर ही कारवाई करण्यात आली. दारूबंदी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार छापा टाकण्यात आला असता समाधान हरिदास लोंढे (वय ३५, रा. बोडकेवाडी, माण, ता. मुळशी) हा विनापरवाना देशी दारूची विक्री करताना आढळून आला.
कारवाईदरम्यान आरोपीच्या ताब्यातून पॉवर लाईम पंच, पॉवर मस्त संत्रा आणि जनता संत्रा या प्रकारच्या देशी दारूचा सुमारे २ हजार ३९० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.
आरोपीकडे दारू विक्रीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
औद्योगिक आणि कामगार वसाहती परिसरात सुरू असलेल्या अवैध मद्यविक्रीवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून अशा बेकायदेशीर व्यवसायांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पुढील तपास दारूबंदी पथकाकडून करण्यात येत आहे.



