प्रतिनिधी युनूस खतीब पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड, दि. ३० जून : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत मोठे पाऊल उचलत १५६ एनडीपीएस गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले तब्बल २ कोटी ६४ लाख १३ हजार ७१० रुपयांचे अंमली पदार्थ जाळून नष्ट केले आहेत.
मा. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार गठित करण्यात आलेल्या समितीच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. रांजणगाव एमआयडीसी येथील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेडच्या भट्टीमध्ये अंमली पदार्थांचा नाश करण्यात आला.
नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थांमध्ये ३१५ किलो गांजा, ७६१ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन), १२ किलो अफूची झाडे, ३०० ग्रॅम ब्राऊन शुगर आणि १०९ किलो डुडा यांचा समावेश आहे.
केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन आणि पोलीस महासंचालक कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गठित समितीमध्ये अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड (अध्यक्ष), पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार आणि पोलीस उपायुक्त संदीप आटोळे यांचा समावेश होता. यावेळी प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, पोलीस उपायुक्त संदीप आटोळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.


