शबनम न्यूज | प्रतिनिधी
केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाचा निष्पक्ष व पारदर्शक तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पायल तिवारी बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गँग यांच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात शुक्रवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
पत्रकार परिषदेत या प्रकरणाशी संबंधित कागदोपत्री पुरावे, माहिती आणि काही महत्त्वाची कागदपत्रे प्रसारमाध्यमांसमोर सादर करण्यात आली. यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी केतन अग्रवाल प्रकरणातील सत्य दडपण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नसून न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशारा दिला.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, केतन अग्रवालच्या कुटुंबावर ओढवलेले दुःख इतर कोणत्याही कुटुंबाच्या वाट्याला येऊ नये, यासाठी हा लढा उभारण्यात आला आहे. हा केवळ एका कुटुंबाचा प्रश्न नसून प्रत्येक तरुणाच्या सुरक्षिततेचा आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वासाचा विषय असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रकरणाचा निष्पक्ष, सखोल, पारदर्शक आणि वेळबद्ध तपास करून ज्यांच्याविरुद्ध पुरावे आढळतील त्यांच्यावर कोणताही राजकीय, आर्थिक अथवा सामाजिक दबाव न मानता कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या पत्रकार परिषदेला अध्यक्षा संगीता तिवारी, कार्याध्यक्षा रूपाली पाटील, उपाध्यक्षा शोभा पुणेकर, उपाध्यक्षा सोना आव्हाड आणि सचिव भारती लोंढे उपस्थित होत्या.
यावेळी “केतन अग्रवालला न्याय मिळालाच पाहिजे”, “सत्य दडपण्याचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडला जाईल” आणि “न्यायासाठी आमचा लढा अखेरच्या श्वासापर्यंत सुरू राहील” अशा घोषणा देण्यात आल्या.


