पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी
मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथे हातभट्टी दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या मद्यबंदी पथकाने अटक केली असून त्याच्याकडून ७० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 29) सकाळी साडेसातच्या सुमारास सुदुंबरे येथील दाभाडे रोडलगत तेजस बोडके यांच्या मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली. मद्यबंदी पथकाचे पोलीस कर्मचारी लक्ष्मीकांत उद्धवराव पाटणगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला.
यावेळी आरोपी राज दलक्सिंग राजपूत (वय 23) याच्या ताब्यातील एमएच 14 सीएस 6656 क्रमांकाच्या वॅगनआर कारमधून 70 लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. जप्त दारूची किंमत सुमारे 7 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. चौकशीदरम्यान ही दारू आरोपी प्रदीप गुड्डावन याने पुरवल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी राजपूत याला अटक करण्यात आली असून दारू पुरवठा साखळीचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.


