पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
पोलीस भरतीत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाची ३ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुर भाऊसाहेब पोळ (वय २४, रा. मोशी) यांनी जुलै २०२४ मध्ये पोलीस भरतीसाठी अर्ज भरल्यानंतर वाघोली येथील एका अकॅडमीत प्रशिक्षण सुरू केले होते. याच दरम्यान त्यांची ओळख आरोपी सुरज शिवले याच्याशी झाली. त्याने पोलीस भरतीत नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
यानंतर आरोपीने फिर्यादीची ओळख बिपीन मोहिते व संतोष कटारे यांच्याशी करून दिली. आरोपींनी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली वेळोवेळी मोठी रक्कम उकळली. सुरज शिवले याने १.५० लाख रुपये घेतले असून त्यापैकी २५ हजार रुपये परत केले, तर उर्वरित १.२५ लाख रुपये परत केले नाहीत. तसेच बिपीन मोहिते याने २.५० लाख रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.
नोकरी मिळाली नसल्याने आणि पैसेही परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली. तिघा आरोपींनी संगनमत करून नोकरीचे आमिष दाखवत एकूण ३ लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.


