विशेष लेख | गजाला सय्यद
मराठी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन २०२६ नुकतेच मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पत्रकारांच्या उपस्थितीने हे अधिवेशन पत्रकारितेच्या विचारमंथनाचे आणि नव्या दिशांचा वेध घेणारे व्यासपीठ ठरले. पिंपरी-चिंचवड, पुणे, लातूर, पंढरपूरसह विविध जिल्हे, तालुके आणि खेड्यापाड्यांतून आलेल्या पत्रकारांनी या महाअधिवेशनात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सकाळपासूनच पत्रकारांची लगबग सुरू झाली होती. नाश्त्यानंतर पार पडलेल्या चर्चा सत्रात पत्रकारांनी आपल्या कामकाजादरम्यान येणाऱ्या अडचणी, आव्हाने आणि व्यावसायिक समस्यांवर सविस्तर मांडणी केली. विविध भागांतून आलेल्या पत्रकारांच्या भावना आणि अनुभव ऐकून उपस्थितांमध्ये एकात्मतेची भावना अधिक दृढ झाली. पत्रकारांच्या समस्यांवर योग्य तो पाठपुरावा करून उपाययोजना करण्याचे आश्वासन मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी दिले.
अधिवेशनातील विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विषयावरील मार्गदर्शन सत्र. हिंदुस्तान टाइम्सचे डिजिटल संपादक हारीस शेख यांनी प्रात्यक्षिकांसह पत्रकारांना एआय तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली. बदलत्या पत्रकारितेच्या युगात एआयची भूमिका काय असणार, त्याचा मराठी पत्रकारितेवर कसा परिणाम होईल आणि पत्रकारांनी या तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर कसा करावा याविषयी त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.

पत्रकारांच्या नोकऱ्या एआयमुळे धोक्यात येतील ही भीती निराधार असल्याचे स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, घटनास्थळी जाऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याची क्षमता, मानवी संवेदनशीलता, सामाजिक संदर्भ समजून घेण्याची ताकद आणि सत्य शोधण्याची वृत्ती ही कोणतेही तंत्रज्ञान बदलू शकत नाही. भाषांतर, प्राथमिक वृत्त मसुदे तयार करणे, अहवालांचा सारांश काढणे, आकर्षक मथळे सुचविणे आणि डिजिटल माध्यमांसाठी एसईओ-अनुकूल मजकूर तयार करणे यासाठी एआय पत्रकारांचा प्रभावी सहकारी ठरू शकतो, असे त्यांनी उदाहरणांसह सांगितले.
यानंतर आयोजित करण्यात आलेल्या भोजन व्यवस्थेचा सर्व उपस्थितांनी आस्वाद घेतला. त्यानंतर प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते गौर गोपाल दास यांनी ‘पत्रकारांचे मानसिक स्वास्थ्य’ या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन केले. आजच्या स्पर्धात्मक आणि तणावपूर्ण वातावरणात पत्रकार अनेक प्रकारच्या दबावाखाली काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. सत्य समाजापुढे आणण्याच्या ध्येयाने पत्रकारिता स्वीकारलेल्या पत्रकारांनी कितीही अडचणी आल्या तरी सत्याची बाजू मांडत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

“सत्यासाठी लढताना अनेक वेळा मनाविरुद्ध गोष्टी कराव्या लागतात. मात्र, परिस्थितीशी संघर्ष करत पत्रकारांनी सत्याची कास सोडू नये. त्यामुळे अंतर्मनातील घुसमट कमी होते आणि मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवता येते,” असे गौर गोपाल दास यांनी सांगितले. त्यांच्या विचारांना उपस्थित पत्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यानंतर अधिवेशनाच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. या महाअधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल जिष्णू देव वर्मा होते. व्यासपीठावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, प्रेरक वक्ते गौर गोपाल दास, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे, एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक, पुढारी माध्यम समूहाच्या मल्टिमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर, राज्यपालांचे सचिव प्रशांत ननावरे तसेच मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वेळी पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल विविध पत्रकारांना ‘आदर्श पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. एबीपी माझाच्या भारती अत्रे-सहस्त्रबुद्धे, नवराष्ट्रचे संपादक संजय मलमे, झी २४ तासचे गणेश मोरे, नवशक्तीचे प्रकाश सावंत, साम टीव्हीचे शिवाजी शिंदे आणि पुण्यनगरीचे शैलेंद्र शिर्के यांचा सन्मान करण्यात आला. पुरस्कार वितरणाचा हा क्षण उपस्थितांसाठी प्रेरणादायी आणि अभिमानास्पद ठरला. अनुप मोरे, संस्थापक-अध्यक्ष, अनुप मोरे सोशल फाउंडेशन आणि नीलय मेहता, नीलया एज्युकेशन, पुणे यांना सामाजिक कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात आला.
मान्यवरांच्या प्रेरणादायी विचारांनी, पत्रकारितेच्या भविष्यावर झालेल्या चर्चांनी आणि नव्या तंत्रज्ञानाच्या ओळखीने समृद्ध झालेले हे अधिवेशन प्रत्येक पत्रकारासाठी एक संस्मरणीय अनुभव ठरले. माझ्यासह उपस्थित सर्व पत्रकारांनी या कार्यक्रमातून नवी ऊर्जा, नवे विचार आणि नव्या जबाबदाऱ्यांची जाणीव घेऊन परतीचा प्रवास सुरू केला.
शेवटी सर्व पत्रकारांनी एकत्र येत आठवणींचा ठेवा जपण्यासाठी सामूहिक छायाचित्र घेतले आणि ज्ञान, प्रेरणा व पत्रकार बांधवांमधील एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या भव्य महाअधिवेशनाची सांगता झाली.


